
नेतृत्व बदलावरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्यात यावा व गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी कॉँग्रेसमध्ये जोर धरू लागली आहे. पाच माजी मुख्यमंत्र्यांसह 23 ज्येष्ठ नेत्यांनी तसे पत्रच हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले. त्यावरून चर्चा सुरू असतानाच सोनिया यांनीही पदत्यागाचा निर्णय घेतला आणि एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा, असे पत्रोत्तर दिले आहे. दरम्यान, आज सोमवारी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक होणार असून काँग्रेसचे गांधी आधार कार्ड संपणार अशी शक्यता आहे. सोनिया राजीनामा देतील आणि आजच नव्या नेत्याची निवड होईल, असे सांगण्यात येते.
राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वर्षभरानंतरही राष्ट्रीय पातळीवर पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याने पक्षाचे नुकसान होत असल्याबद्दल कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून चिंता व्यक्त केली आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटीची आज बैठक
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठविणाNया २३ नेत्यांमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भूपिंदरसिंह हुडा, वीरप्पा मोईली आदी नेत्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीची सोमवारी दिल्लीत बैठक होत असून नेतृत्वाच्या मुद्द्यावर काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस नेत्यांच्या मागण्या काय?
– काँग्रेस पक्षाला प्रभावी आणि पूर्णवेळ नेतृत्व मिळावे.
-नेतृत्व प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे असावे.
– नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.
– काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणुका व्हाव्यात.
– संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी.
– प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.
सोनिया गांधी काय म्हणतात…
काँग्रेस कार्यकारी समितीनं 10 ऑगस्टला पक्षाची सूत्रे स्वीकारण्याची विनंती केली होती. तेव्हा पुन्हा पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचं समितीला सांगितलं होतं. त्याबरोबर हंगामी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना लवकर पक्षाध्यक्ष पदाची निवड करावी, अशी अटही घातली होती. पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोडायला तयार असून, नव्या अध्यक्षांची निवड करावी.





























































