काँग्रेसमध्ये दोन कार्यकारी अध्यक्ष फॉर्म्युल्यावर विचार, सुशिलकुमार शिंदे, खरगे यांच्या नावांची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षात मोठय़ा प्रमाणावर उलथापालथ सुरु झाली आहे. त्यातच आता अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर राहुल गांधी ठाम असल्याने पक्षात दोन कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करण्यावर विचार सुरु आहे. एक कार्यकारी अध्यक्षपद दक्षिण हिंदुस्थानातील नेत्याला द्यावे, तर दुसरे कार्यकारी अध्यक्षपदावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या नेत्याची नेमणूक करावी , असा फॉर्म्युला पुढे आला आहे.

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावांची चर्चा आहे. तसेच युवानेता म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांचेही नाव कार्यकारी अध्यक्षपदाकरिता पुढे आले आहे.

संसद अधिवेशनापूर्वी बदलाची शक्यता
अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्याने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याचा फॉर्म्युला पुढे आला आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेस पक्षात हे बदल होऊ शकतात.

– राज्यस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची खुर्ची धोक्यात आली आहे. राजस्थानात काँग्रेसला लोकसभेची जागा मिळाली नाही. यामागे गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचे काँग्रेसचे मत आहे.