आम्ही फसवणार नाही, लोकांच्या खात्यात खटाखट पैसे टाकणार!

rahul-gandhi

सामना ऑनलाईन । कानपूर

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे खोटे वचन दिले होते. आता मी तुम्हाला सांगतो काँग्रेस काय करणार, आम्ही तुमच्या खात्यात खटाखट पैसे टाकणार, फसवणार नाही अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.

कानपूर येथील एका प्रचारसभेत ते बोलत होते. ‘न्याय’ योजनेअंतर्गत प्रत्येकाच्या खात्यात वर्षाला 72 हजार रुपये टाकणार. दर महिन्याला तुमच्या खात्यात खटाखट 12 हजार रुपये टाकणार असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, आधीचे 100 दिवसांचे मनरेगा आता 150 दिवसांचे करण्यात येईल. मनरेगाचा पैसा मिळेल पण कमीत कमी 12 हजार मिळकत असेल तर ‘न्याय’ योजनेचाही लाभ मिळेल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.