व्हीप धुडकावणाऱ्या सदस्यांना निलंबित करणारच: काँग्रेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषद सभापती निवडीत सहभाग घेऊ नये असा व्हीप सत्ताधारी गटातील काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या २७ सदस्यांना राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी बजावला होता. त्यातील १८ जणांनी व्हीप स्वीकारला मात्र तो धुडकावत निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यात आला. याबाबत झालेल्या निवडीचे इतिवृत्त जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्ही घेतले आहे. जे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना निलंबित केल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉ जयंद्र परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेतली. यावेळी निवड प्रक्रियेच्या इतिवृत्ताची माहिती मागविण्यात आली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने स्थापन केलेल्या गटाची माहिती घेतली. यावेळी प्रकाश जैतापकर, पुष्पसेन सावंत, काका कुडाळकर, आबा मुंज, सर्फराज नाईक आदी उपस्थित होते.

आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना गटाबाबत विचारले असता, त्यांनी सादर केलेली कागदपत्रे आम्ही घेतली आहेत. त्यांच्या गटाला मान्यता मिळाली कि नाही ? हे वरिष्ठ स्तरावरून कागदपत्र मागितल्यावर कळणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे यावेळी बोलताना डॉ परुळेकर यांनी सांगितले. सर्व कागदपत्रे मिळाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही याबाबत दाद मागणार आहोत. तसेच काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काम करणे हि जनतेची शुध्द फसवणूक आहे. जर राजीनामे देऊन हे २७ सदस्य पुन्हा निवडणुकीला गेले असते तर खऱ्या अर्थाने त्यांची ‘स्वाभिमान’ व्याख्या दिसली असती, असा टोमणा डॉ. परुळेकर यांनी मारला.