बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधून काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी दुपारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. माघार घेतली असली तरी आमचा कुणालाही पाठिंबा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 5 तारखेला फोन केला होता. कालही आणि आजही त्यांनी फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार गटाच्या इतर नेत्यांनीही याबाबत माघारीची विनंती केली. सकाळी रोहित पवार यांनीही भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. अजित पवारांच्या अपघाताबाबत एफआयआर नोंदवा ही काँग्रेसची भूमिका योग्य असल्याचेही ते म्हणाले. पार्थ पवारांच्या विधानाबाबत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. सुप्रिया सुळे, शरद पवारांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या नंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चर्चा झाली आणि महाराष्ट्राची संस्कृती, सभ्यता म्हणून बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

भाजपशी विरोध आमचा कायम स्वरुपाचा आहे. अजित पवार गटानेही भाजपच्या विखारी विचारांच्या पक्षासोबत राहू नये ही भूमिकाही आमची कायम आहे. अजित पवार यांच्यासारख्या नेत्याच्या अपघाताचा तपास योग्य पद्धतीने केला जात नाही. गुन्हे दाखल केले जात नाही. एफआयआरबाबत आम्ही पाठपुरावा करत राहू, असेही सपकाळ म्हणाले.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. या जागेवर अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसनेही ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेत आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राज्यातील नेत्यांचे प्रयत्न सुरू होते.


हे वाचाअजितदादांनी काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केलंय, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी! – सुप्रिया सुळे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही तीन वेळा फोनवरून हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी सपकाळ यांची घेत ही निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत काँग्रेसला साद घातली होती. तसेच अजित पवार गटाच्या काही आमदारांनीही सपकाळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीत हायकमांडशी चर्चा केली आणि पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.