कावेबाज चीनच्या पुन्हा नव्या उचापती; सीमेवर नव्या बांधकामाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-चीन सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. मागच्या एक वर्षापासून चीनने हिंदुस्थानी सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता चीनने सीमेजवळ पुन्हा एकदा बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलजवळील सिक्कीम, पूर्व लडाखमध्ये हे स्थायी बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. चिनी सैनिक हिंदुस्थानी सीमेजवळ ठाण मांडून बसण्यासाठी तयारी करत असल्याचे यातून दिसत आहे. उत्तर सिक्कीमच्या नकुल भागापासून काही किलोमीटर अंतरावर हे बांधकाम सुरू आहे. या भागात हिंदुस्थानी जवान आणि चिनी सैनिकांमध्ये झडप झाली होती. गेल्या काही दिवसांत चीन सीमेवर पुन्हा आपली ताकद वाढवत असल्याचे दिसत आहे. चिनी सैनिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे तसेच आवश्यकता असल्यास चाल करण्यासाठी हे बांधकाम केले जात आहे. या प्रकारची बांधकामे लडाखसह अरुणाचल प्रदेशातील हिंदुस्थानी सीमेजवळ बनवली गेल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासोबत सीमेवर पोहोचण्यासाठी हायटेक रस्त्यांची निर्मितीही करण्यात आली आहे.