‘सिद्धेश्वर’ची चिमणी पाडल्यानंतरही विमानाचे उड्डाण अवघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. 62 एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेत निर्माण झालेला गुंतागुंतीचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या जमिनीवर विमानतळ प्राधिकरणाचे नाव लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चिमणी पडली तरी आता 62 एकर जमिनीचा प्रश्न उभा राहिला असून, मोठी विमाने उतरण्यासाठी 105 अडथळे कायम आहेत, त्यामुळे विमानाचे उड्डाण होणे अवघड आहे.

सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरलेल्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या वादग्रस्त चिमणीएवढा 62 एकरांच्या भूसंपादनाचा पर्यायाने विमानतळ प्राधिकरणाचा प्रश्न जटिल नाही, असे मानले जात आहे. होटगी रोड विमानतळासाठी 1971 मध्ये कुमठे व मजरेवाडी गावातील 148 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. या जमिनीपैकी 60 एकर जमिनीवर अजूनही महाराष्ट्र शासनाचे नाव आहे. या जमिनीवर विमानतळ प्राधिकरणाचे नाक असणे आवश्यक आहे. या जमिनीवर मूळ जमीनमालकांनी दावा केला असून, यापैकी 30 टक्के जमिनीवर शेतकऱयांनी अतिक्रमण केले आहे. मात्र, ताबा प्राधिकरणाकडे आहे, तर जमिनीवर महाराष्ट्र शासनाचे नाव आहे. यामुळे या जमिनीवर मोजणी, सर्व्हे करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणास अडथळा येत आहे. ही 62 एकर जमीन तीन गटांत विभागलेली असून, पाच शेतकऱयांची मालकी आहे. याबाबत शेतकऱयांनी अपर जिल्हाधिकारी यांच्यापासून न्यायालयात वेगवेगळ्या स्तरावर सुनावण्या सुरू आहेत.

15 जुलैला न्यायालयात सुनावणी

याबाबत येत्या 15 जुलैला न्यायालयात सुनावणी असून, ही गुंतागुंत सोडवून या जमिनीवर यापूर्वी प्राधिकरणाचे नाव लागले होते. तसेच ऍकॉर्डही करण्यात आला होता, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

मोठय़ा विमानांबाबत 105 अडथळे कायम

चिमणीच्या पाडकामानंतर विमानाचे उड्डाण होईल हे सांगणे अवघड आहे. कारण मोठी विमाने उतरण्यात अजून 105 अडथळे आहेत. हे अडथळे काढण्याबरोबरच विविध परवानग्यांना वेळ लागणार आहे. 62 एकर जमिनीसंदर्भातील महसूल विभागातील प्रत्येक टप्प्यावर 60 ते 90 दिवसांची अपील करण्यासाठीची मुदत आहे. यामुळे शेतकऱयांचे दावे निकाली काढून महाराष्ट्र शासनाच्या जागी विमानतळ प्राधिकरणाचे नाव येण्याच्या प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे.