
सामना ऑनलाईन । मुंबई
येत्या 15 ऑगस्टपासून 29 ऑगस्टपर्यंत मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. या जमावबंदीमुळे आमच्या सण-उत्सवांवर गदा येईल. आम्ही एकत्र येऊन सण साजरे करूच शकत नाही, असा आक्षेप ‘लोकांचे दोस्त’ या संघटनेने घेतला आहे.
‘लोकांचे दोस्त’ या संघटनेने स्वातंत्र्यदिनी दुपारी ‘तिरंगा उठाव, भाजप हटाव’ अशी रॅली दादर येथे आयोजित केली आहे. या रॅलीला परवानगी नाकारताना शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने ‘लोकांचे दोस्त’ संघटनेला एका लेखी पत्र दिले आहे. त्या पत्रानुसार मकोका 1951 कलम 37 (37) अन्वये दि. 15 ऑगस्ट ते 29 ऑगस्टदरम्यान शहरामध्ये जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे या कालावधीत मोर्चा, मिरवणूक काढण्यास बंदी असल्याचे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या कालावधीत अनेक सण-उत्सवदेखील आहेत; पण पोलिसांच्या जमावबंदीमुळे सण उत्सवातसुद्धा चार-पाच जणांनी एकत्र यायचे नाही का, असा सवाल ‘लोकांचे दोस्त’ संघटनेचे अध्यक्ष रवी भिलाणे यांनी केला आहे.




























































