बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा होणार 3 हजार रुपयांचा दुसरा हप्ता,राज्यातील 10 लाख कामगारांना मिळणार लाभ

1786

कोरोना लॉकडाऊनमुळे इमारत बांधकामे ठप्प झाल्यानंतर यावर रोजीरोटी असणाऱया नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या नोंदणीकृत इमारत कामगारांच्या खात्यात 3 हजार रुपयांचा दुसरा हप्ता जमा होणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील 10 लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेतला आहे. कोविड -19 या विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत 2 हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै पर्यंत राज्यातील 9 लाख 14 हजार 748 बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने 183 कोटी रुपये खर्च केले आहेत.

कोरोनामुळे इमारत व इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाहीत त्यामुळे बांधकाम कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित बांधकाम कामगारांना 3 हजार रुपयाचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या