
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई तुंबवण्यास जी बांधकामे कारणीभूत आहेत अशी बांधकामे अक्षरशः पाडून टाकण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. पाण्याचा निचरा का होत नाही याचा शोध घेताना पालिका प्रशासनाने शहर आणि उपनगरातील तब्बल ६ हजार २०८ बांधकामांची यादी तयार केली आहे. ही बांधकामे ऑक्टोबरपासून पाडण्यात येणार असून प्रशासनाने निविदाही काढल्या आहेत.
पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा आणि मुंबईत पाणी तुंबू नये म्हणून पालिकेने विविध लाँग टर्म उपाययोजना केल्या आहेत. त्यात पंपिंग स्टेशन उभारणे, पर्जन्यजलवाहिन्या रुंद करणे अशी कामे करण्यात आली. मात्र तरीही गेल्या दोन वर्षांत पाणी साचण्याची ठिकाणे वाढली. त्यामुळे पालिका प्रशासनाने यंदा पाणी साचणार्या ठिकाणांचे मायक्रो प्लॅनिंग करण्याचे ठरवले. त्याचाच भाग म्हणून ही अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यात येणार आहेत.
सन २०१७ च्या पावसाळ्यात २२५ ठिकाणी पाणी साचत असल्याचे आढळून आले होते. या सर्व ठिकाणी पाणी साचण्यामागील कारणांच्या मुळाशी जाऊन सखोल अभियांत्रिकीय अभ्यास करण्यात आला. त्या आधारे निश्चित करण्यात आलेल्या विविध उपाययोजना अशा १२० ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आल्या. या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम यावर्षीच्या पावसाळ्यात दिसून आला. यातल्या बहुतांश ठिकाणी पाण्याचा निचरा गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक गतीने व प्रभावीपणे होत असल्याचेही दिसून आले.
पाणी साचणारी एकूण ठिकाणे – १०५
- शहर भागातील – ५५ ठिकाणे
- पूर्व उपनगरात – ३३
- पश्चिम उपनगरात – १७ ठिकाणे
एवढी बांधकामे पाडणार
- शहर भागातील १,७०२
- पूर्व उपनगरांमधील ३,१३४
- पश्चिम उपनगरातील १,३७२
- एकूण ६ हजार २०८ एवढी बांधकामे बाधित होणार आहेत.
ऑक्टोबरचा मुहूर्त
ही बांधकामे पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या कामांचे कार्यादेश सप्टेंबर अखेरपर्यंत देण्यात येणार असून पाडकाम ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे.























































