
ग्राहकाकडून कॅरी बॅगेसाठी 20 मागणाऱ्या एका प्रसिद्ध कंपनीला ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावला आहे. दंड आणि नुकसानभरपाईच्या स्वरुपात या कंपनीला 35 हजार रुपये भरावे लागणार आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार रिमा चावला यांनी मुंबईतील एका प्रसिद्ध मॉलमधून एसबेडा या कंपनीची 1690 रुपयांची बॅग खरेदी केली. त्या बॅगेसाठी कॅरी बॅग देऊ करण्यात आली आणि त्यासाठी 20 रुपये अधिक चार्ज घेण्यात आला. वास्तविक ही रक्कम अवैधरित्या घेण्यात आली होती. कारण, त्या बॅगेवर एस्बेडा कंपनीचा लोगो लावण्यात आला होता. ती एका अर्थी कंपनीची जाहीरात होती.
या प्रकरणी कंपनीला ईमेल करूनही कंपनीने कोणतंही उत्तर दिलं नाही. त्यामुळे रिमा यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली. आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी अशा प्रकारे ग्राहकाकडून अधिकचे पैसे वसूल करणं चूक आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्याचा नुकसान भरपाई म्हणून दीड लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी चावला यांच्या वकिलाने केली.
दुसरीकडे एस्बेडाच्या प्रतिनिधींनी सुनावणीसाठी हजर राहण्यास नकार दिला. त्यामुळे ग्राहक न्यायालयाने एस्बेडाला 20 रुपये परत करण्याचे आदेश दिले. तसंच, खटल्याचा खर्च म्हणून एस्बेडाने चावला यांना 3 हजार आणि मानसिक त्रासाची भरपाई म्हणून 10 हजार रुपये द्यावेत असे आदेश दिले. त्याखेरीज ग्राहक कल्याण कोषात 25 हजार रुपये जमा करण्याचे आदेशही दिले आहेत.



























































