
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
लेन्स घातल्यानंतर डोळय़ांचा मेकअप करताना तो काळजीपूर्वक करावा लागतो. कारण आयलाइनर, मस्कारा, आयशॅडो याचे काही कण डोळय़ांत जाण्याची भीती जास्त असते. त्यामुळे हे सगळे लावताना अत्यंत काळजी घ्यावी लागते.
डोळय़ांच्या मेकअपमुळे चेहऱयाच्या सौंदर्यात भर पडते. चष्मा वापरल्याने डोळय़ांचा मेकअप दिसत नाही म्हणून अनेक जणी लेन्स वापरण्यास प्राधान्य देतात. सध्या बाजारात एका दिवसात वापरून फेकणाऱया लेन्सेसदेखील उपलब्ध आहेत. अलीकडे मेकअप करताना कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर केला जातो.
अनेक वेळा चष्मा असल्यामुळे योग्य लेन्स मिळणार नाहीत असे वाटते, पण बायफोकल, सिलेंड्रिकल अशा दोन्ही लेन्स बाजारात उपलब्ध असतात. तसेच योग्य प्रकारे लेन्स विकत घेतल्यामुळे डोळय़ांना कोणतीही हानी पोहोचत नाही. कॉन्टॅक्ट लेन्सेस फिटिंग बघून घेणे महत्त्वाचे असते लेन्सेस या दररोज लावून फेकून देणाऱया म्हणजेच डिस्पोजेबल, तसेच आठवडय़ानंतर बदलाव्या लागणाऱया व महिनाभर वापरू शकणाऱया अशा असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते.
काय काळजी घ्याल…
लेन्स लावताना त्याची काळजीही तेवढीच घ्यावी लागते. या लेन्सेस वापरताना डोळय़ांवर लावताना हात स्वच्छ धुऊन मग त्या डोळय़ांवर लावण्यास घ्याव्यात. तसेच या लेन्सेसचे सोल्युशन काहीसे महाग असेल तरी ते कमी प्रमाणात न वापरता किंवा जुनी तारीख उलटून गेलेले पुन्हा न वापरता, चांगल्या कंपनीचे सोल्युशन घेऊन प्रत्येक एक दिवसाने हे सोल्युशन बदलणेही गरजेचे असते.
– कॉन्टॅक्ट लेन्सेस वेगवेगळय़ा ब्रँडच्या असतात. आपल्या देशातील त्वचेच्या रंगासाठी हेजल, ब्राऊन किंवा ग्रे हे तीन रंग शोभून दिसतात. डोळे आकाराने मोठे असतील तर तुम्ही कोणत्याही रंगांच्या लेन्सेस वापरल्या तरी त्या छान दिसतात. डोळय़ांमध्ये अंतर कमी असेल तर लाइट कलर घ्यावा.
– अलीकडे साडी किंवा ड्रेसला मॅचिंग रंगाच्या लेन्सेस वापरण्याकडेही अनेकांचा कल असतो. मात्र असे करण्यापेक्षा तुमच्या डोळय़ांचा आकार तसेच तुमच्या त्वचेचा रंग पाहून तुम्ही लेन्सेसच्या रंगाची निवड करावी.
– मेकअप करताना प्रथम लेन्सेस लावून घेऊन मग मेकअप करण्यास सुरुवात करावी. कारण अनेक वेळा डोळय़ांचा मेकअप झाल्यानंतर लेन्सेस लावायला घेतल्यास बऱयाच वेळा डोळय़ांतून पाणी येते. डोळय़ांतील काजळ, आयलाइनर, मस्कारा पसरण्याची भीती असते.
– सुरुवातीला लेन्स लावताना भीती वाटते. सरावाने ही भीती दूर होते. तुम्ही अगदी काही सेकंदांमध्ये लेन्स लावू शकता. लेन्सेस हे डोळय़ांच्या सौंदर्यात भर पाडत असल्यामुळे त्याचा योग्य रंग व योग्य आकार यांची निवड डॉक्टरकडून करून घेणे चांगले ठरेल.





























































