
पुणे जिल्ह्यात दिवसभर पावसाचा येलो अलर्ट आणि सायंकाळनंतर रेड अलर्ट देण्यात आला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे शहरातील वाहतूक मंदगतीने सुरू होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मुळा-मुठा आणि नीरा खोऱ्यातील धरणांमधून विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. दिवसभर संततधार आणि अधूनमधून जोराच्या सरी आल्या. दुपारच्या दरम्यान चांगला पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड परिसरातदेखील पावसाने हजेरी लावली. नीरा खोऱ्यामध्ये सर्वत्र चांगला पाऊस झाला. भाटघर, नीरा देवघर या धरणांमधून विसर्ग सोडण्यात आला. मुळा आणि मुठा खोऱ्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने पानशेतमधून १८४२ क्युसेक्स, वरसगावमधून १८७६ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. वीर धरणातून २२ हजार ६३५ क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याने नीरा नदीला पूर आला आहे.
गेले दोन-तीन आठवडे पावसाची उघडीप बसल्यामुळे पुणे जिल्ह्यात खरीप पिकांना ताण पडला होता. पश्चिम पट्ट्यात भाताच्या पिकांनादेखील पावसाची गरज होती. सध्या होत असलेला पाऊस खरीप पिकांना उपयुक्त असून, बाजरी भुईमूग कडधान्याची पिके तसेच भातासाठी फायदेशीर ठरला आहे. धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर कायम असून, घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट आहे. त्यामुळे धरणांमधून जादा पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुठा, नीरा आणि इंद्रायणी नदीला पूर येण्याची शक्यता असल्याचे पूरनियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.