
सामना प्रतिनिधी । लातूर
कोतल शिवणी रस्त्यावरून प्रवास करताना अज्ञात युवकांनी दुचाकीस्वारावर गोळी झाडली. मात्र ज्याला गोळी मारायची होती तो नव्हता तर दुसर्याच व्यक्तीवर गोळी घातल्याचे लक्षात येताच दोन्ही युवक मोटारसायकल वरून फरार झाले. 13 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास निलंगा तालूक्यातील कोतल शिवणी शिवारात ही घटना घडली. गोळी लागून जखमी झालेला अर्जुन विश्वनाथ जोगदंड याला काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय मात्र येऊन गेला.
या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात अर्जुन विश्वनाथ जोगदंड याने तक्रार दाखल केली. खाडगाव रोड भागातील सुरेश चव्हाण यांच्या जेसीबी वर फिर्यादी हा ऑपरेटर म्हणून काम करीत होता. लातूर तालूक्यातील मळवटी येथे 13 रोजी दिवसभर जेसीबी वर काम करून सायंकाळी तो त्याचा मित्र स्वामी सोबत मळवटी वरून निघाला. बाभळगाव येथे फिर्यादीची मोटारसायकल ठेवलेली होती. ती घेऊन रात्री 10.30 च्या सुमारास तुपडी गावाच्या पुढे कोतल शिवणी शिवारात असलेला पुल ओलांडून पुढे गेला असता उजव्या खांद्याजवळून गोळी लागल्याचा आवाज आला मोटारसायकल थांबवले असता एक काळ्या रंगाची पल्सर गाडी त्याच्यासमोर उभा राहिली. रिवॉल्व्हर काढून मोटारसायकलवरील व्यक्तीने जाग्यावर थांब नाही तर तुझा गेम करीन असे म्हटले. मात्र त्याच्या सोबत असलेल्याने अरे हा तो नाही, हा दुसराच आहे चल असे म्हणून ते दोघेही लातूरच्या दिशेने मोटारसायकलवर निघून गेले.
फिर्यादी तिथून घरी गेला आणि फिर्यादीचे वडील, चुलत भाऊ, मित्र याच्यासोबत निलंगा येथील खाजगी रुग्णालयात गेले. 14 रोजी दुपारी 3 वाजता ऑपरेशन करून खांद्यातील छरा काढण्यात आला. अज्ञात व्यक्तीने जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळी मारली मात्र नशिबाने गोळी खांद्यात घुसल्याने फिर्यादी अर्जुन जोगदंड बचावला. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी हल्लेखोर नेमके कोणास मारणार होते याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
























































