कॉन्ट्रॅक्ट भरती, सरकारी कर्मचाऱ्यांची आज निदर्शने

मिंधे सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात सरकारी कर्मचारी आणि शिक्षक उद्या राज्यव्यापी लाक्षणिक आंदोलन करणार आहेत. सर्व सरकारी कार्यालये आणि शाळा-महाविद्यालयांसमोर यावेळी जोरदार निदर्शने केली जाणार आहेत.

राज्य शासनातली अडीच लाख रिक्त पदे योग्य रितसर मार्गाने कायमस्वरूपी सत्वर भरली गेली पाहिजेत अशी रास्त मागणी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या 17 लाख सभासदांनी केली आहे. शासनाने आमच्या रास्त मागणीस वाटाण्याच्या अक्षता लावल्यास राज्यात निर्णायक संघर्ष उभा केला जाईल, असा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिला आहे.

6 सप्टेंबर 2023 चा शासन निर्णय पारित करून राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱयांच्या तसेच जनसामान्यांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. 138 कुशल व अकुशल कर्मचाऱयांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी 9 कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. आज 138 पदे कंत्राटी पद्धतीने भरून अशा प्रकारच्या कंत्राटी भरतीसाठीचा चंचूप्रवेश शासन करू पाहत आहे, असा समन्वय समितीचा आरोप आहे.