
सामना प्रतिनिधी । मुंबई
मालाडमध्ये जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आज 26 वर गेला आहे. कंत्राटदाराने भिंतीचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे केल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाल्याची गंभीर दखल पालिकेने घेतली असून सखोल चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. या चौकशीत कंत्राटदार दोषी आढळल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
मालाड दुर्घटनेतील जखमींमधील अत्यवस्थ असलेल्या चौघांचा आज मृत्यू झाला, तर जखमी 121 पैकी 72 जणांवर अजूनही उपचार सुरू असून 23 जणांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या घटनेनंतर पालिकेने चौकशी समिती नेमली असून कंत्राटदाराकडून बोगस काम केल्यामुळे जीवितहानी होत असेल तर ही बाब खपवून घेणार नाही, असा इशारा देतानाच तुमच्यावर ‘एफआयआर’ का नोंदवू नये, असा सवाल करून तातडीने स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
…म्हणूनच भिंत कोसळली
मालाड दुर्घटनेच्या प्राथमिक अहवालात भिंतीवर साठलेल्या पाण्याचा दाब आल्यामुळे ती कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय जमा झालेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवलेली छिद्रे बुजलेली असल्याचेही निदर्शनास आले आहे. मात्र याकडे संबंधित कंत्राटदाराने लक्ष दिले नसल्यामुळे पाणी साठून भिंतीवर दाब वाढल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. याशिवाय सुमारे 35 फुटी उंचीच्या भिंतीची रुंदी अतिशय कमी ठेवल्यामुळे भिंत दाब पेलू शकली नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
15 दिवसांत अहवाल देणार
मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दुर्घटनेच्या दिवशीच दिले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने जल अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये व्हीजेटीआय आणि आयआयटीच्या तज्ञांचा समावेशही करण्यात आला असून ही समिती 15 दिवसांत सखोल चौकशी करून रीतसर अहवाल सादर करणार आहे. यानंतर संबंधित दुर्घटनेला जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता भिंतीवर टेकडीच्या उतारावरून अतिवृष्टीत येणार्या पाण्याचा दाब वाढल्याने भिंत कोसळल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी संरक्षक भिंतीलगत मोठ्या प्रमाणात बांधकामे झाल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे संपूर्ण दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर या अपघाताला जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. – प्रवीण परदेशी, पालिका आयुक्त
मालाडच्या दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली आहे. संबंधित आपत्तीग्रस्तांच्या निवार्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. शिवाय या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषी असणार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने कार्यवाहीदेखील सुरू केली आहे. – प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, महापौर
मालाड पिंपरीपाड्यातील दुर्घटनेमुळे इतर घरांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित आपत्तीग्रस्तांचे कुरार, दिंडोशी, मालाड आणि गोरेगावसारख्या जवळच्याच परिसरात पुनर्वसन करा. पालिका, म्हाडाने या परिसरात उपलब्ध असणार्या रिक्त जागांचा शोध घ्यावा आणि आपत्तीग्रस्तांना घरे उपलब्ध करून द्यावीत. पुनर्वसनासाठी ‘2011 संरक्षण’ धोरणानुसार घरे उपलब्ध करून द्यावीत. – सुनील प्रभू, आमदार




























































