शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची शेतीची अवजारे पुरवणारे 4 कंत्राटदार ब्लॅकलिस्टमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | प्रतिनिधी

आत्महत्याग्रस्त गावांतील तब्बल 60 हजार शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने दीडशे कोटी रुपयांचे विशेष विदर्भ पॅकेज जाहीर केले होते पण मृतांच्याही टाळूवरचे लोणी खाणाऱ्या कंत्राटदारांनी शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे पंप संच, शेतीची अवजारे, जैविक खते पुरवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना सदोष व निकृष्ट दर्जाचे शेतीचे साहित्य पुरवल्याचा ठपका ठेवून राज्य सरकारने चार कंत्राटदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या कंत्राटदारांकडून यापुढे कोणत्याही स्वरूपाचे शेतीचे साहित्य खरेदी न करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

 विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारने अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम व वर्धा या सहा जिह्यांसाठी राज्याच्या महसूल व वन विभागाने विशेष विदर्भ पॅकेज जाहीर केले. या योजनेअंतर्गत या सहा जिह्यांतील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या 60 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यासाठी दीडशे कोटी रुपयांचा आर्थिक निधी उपलब्ध करून दिला होता.

चौकशी समितीची नियुक्ती

या योजनेच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्याच्या मोठय़ा प्रमाणावर तक्रारी सरकारकडे आल्या. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गोपाळ शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती. या समितीने सखोल चौकशी करून राज्य सरकाराला अहवाल सादर केला.

साहित्य निकृष्ट दर्जाचे

विदर्भ पॅकेजअंतर्गत पुरवण्यात आलेल्या साहित्यापैकी शेतीचे काही साहित्य सदोष आढळून आले असे या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे निकृष्ट व सदोष कृषी साहित्याची दुरुस्ती व बदलून देण्याचे आदेश संबंधित कंत्राटदारांना दिले होते पण या कंत्राटदारांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.

हे आहेत कंत्राटदार

धारस्कर इंजिनीयरिंग वर्क्स, मूर्तिजापूर, जि. अकोला.

जगदंबा ऍग्रो इंजिनीयरिंग, संभाजीनगर रोड, जालना.

विजय विलियन्स कंपनी, सदर्न ऍग्रो इंजिन प्रा. लिमिटेड, चेन्नई.

सदर्न ऍग्रो द्वारा अंबिका इंजिनीयर्स, गोरेगाव पूर्व.