
सामना ऑनलाईन । पिंपरी – चिंचवड
पिंपरी – चिंचवडमध्ये एका मजनूने प्रेयसीचे लक्ष वेधण्यासाठी ‘शिवडे आय एम सॉरी!’ असे तब्बल 300 बॅनर लावल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका नवीन बॅनरने चर्चेला उधाण आलंय. ‘स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर’, असा आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले बॅनर गुरुवारी आकुर्डी परिसरात लागले होते. या बॅनरबाजी विरोधात महिलांनी संताप व्यक्त केल्याने पोलीस आणि पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली.
गुरुवारी आकुर्डीच्या खंडोबा चौक ते साने चौका दरम्यान रस्त्यावर ‘स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर’, असा मजकूर लिहिलेले बॅनर बघुन नागरिकांमध्ये खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी पिंपळेसौदागर परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी!’ असे बॅनर झळकले होते. त्यावेळी तपासात एका प्रियकराने प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी बॅनरबाजी केल्याचे उघड झाले होते. मात्र पुन्हा अशा प्रकारची बॅनरबाजी हा जाहिरातबाजीचा प्रताप असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी महापालिका प्रशसनाने संबंधीत बॅनर लावण्यासाठी परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे. महिलांनी या वादग्रस्त बॅनरबाजी विरोधात आक्षेप घेतल्यानंतर हे बॅनर काढण्यात आले.


























































