
सामना ऑनलाईन । अमरावती
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केल्याने एका वृद्धास बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी वृद्धाला अक्षरश: चप्पल, बुटाने मारहाण केली. विशेष म्हणजे याचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्यात आला आहे.
भाई रजनीकांत असे हल्ला झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यानंतर दर्यापूर येथील भाजप नगरसेवक संतोष कोल्हे यांनी भाई रजनीकांत हे येथे आले असता हॉटेलमध्ये त्यांना लाथा, बुक्क्या आणि जोड्याने मारहाण केली. आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आणि मी बौद्ध असल्याने याचा राग आल्याने त्यांना मारहाण केल्याचे नगरसेवक संतोष कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
































































