
उत्तर इंग्लंडमधील पोटनिवडणुकीत हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरवरून वाद पेटला आहे. या पोटनिवडणुकीत मजूर पक्षाने प्रकाशित केलेल्या पोस्टर, प्रचार साहित्यात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र आहे. इतरांना मतदान केल्यास असे छायाचित्र दिसण्याचा धोका असल्याचे मजूर पक्षाने म्हटले आहे. अनिवासी हिंदुस्थानींनी या प्रचार साहित्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मजूर पक्षाचा असा प्रचार चुकीचा असल्याचे हिंदुस्थानच्या एका गटाने म्हटले. मजूर पक्षाने हिंदुस्थानी पंतप्रधानांच्या छायाचित्राचा वापर करणे चुकीचे आहे. हिंदुस्थान हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. त्याशिवाय 2019 मधील जी-7 बैठकीनंतर हिंदुस्थान आणि ब्रिटनमधील संबंध अधिक चांगले झाले असल्याचेही मजूर पक्षाशी संबंधित असलेल्या ‘लेबर फ्रेंड्स ऑफ इंडिया’ने म्हटले आहे.


























































