
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
“कोकणातील आंब्याला महाराष्ट्रात सर्वत्र विक्री केंद्र मिळाली पाहिजेत याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण आंबा बागायतदार जगला पाहिजे आणि ते काम कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम आहे.” असे उद्गार सहकार व पणनमंत्री सुभाष बापू देशमुख यांनी सांगतानाच हमी भावापेक्षा कमी भान कोण करत असेल अशांवर कृषी उत्पन्न बाजार समितीने कारवाई केली पाहिजे अशा सूचना सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आंबा-काजू लिलाव गृहाचे रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पांतर्गत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंबा-काजू लिलाव गृहाचे उद्घाटन सहकार आणि पणन मंत्री सुभाषबापू देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, जि.प.अध्यक्षा स्वरूपा साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे, जि.प.चे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये व इतर मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराज आंबा-काजू लिलाव गृहाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, “रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना लिलावासाठी वाशीला जावे लागत होते. रत्नागिरीत लिलाव गृह झाल्यामुळे त्याचा फायदा स्थानिक बागायतदारांना होणार असल्याचे दळवी यांनी सांगितले. त्याचबरोबर कोकणात शेतमाल योजना राबवली गेली नव्हती. स्वतः पणनमंत्री सुभाषबापू देशमुख यांनी दखल घेतली त्यांनी चांगली योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा असे सांगितले. त्याप्रमाणे रत्नागिरीत शेतमाल योजना राबविताना आम्ही 73 लाखाचे शेतमाल कर्ज वितरीत केले अशी माहिती दळवी यांनी दिली. म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत म्हणाले की, मच्छीमार सेस भरत असताना त्यांना आपण सुविधा दिल्या पाहिजेत. त्याकरीता आपण प्रयत्न करावेत. तसेच डिझेल परताव्याबाबतचे सरकारचे नवे धोरण मच्छिमारांना अडचणीत आणणारे आहे त्यामुळे सर्व पक्षांनी एकत्र येऊन मच्छिमारांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन सामंत यांनी केले.
यावेळी सहकार व पणनमंत्री सुभाष बापू देशमुख म्हणाले की, “गेल्या दोन वर्षापासून तारण कर्जासाठी पाठपुरावा करत आहे. व्यापारी कमी भावात माल घेत असतो त्यावेळी तीन महिने मेहनत घेणारा शेतकरी अडचणीत येतो. त्यामुळेच शेतमाल तारण योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यास सुरुवात केली. भविष्यात रत्नागिरी जिल्ह्याने शेतमाल तारण योजनेचे पाच कोटीचे लक्ष्य ठेऊन शेतकऱ्याचा काही फायदा होणार नाही त्यामुळे रत्नागिरीने शेतमालाचे लक्ष्य वाढवावे.” असे सुभाष देशमुख यांनी सांगितले.





























































