
सहकारी आणि मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह बँका आता रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) नियंत्रणात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे बँकांमधील ठेवी सुरक्षित राहणार असून, देशभरातील 8.6 कोटी ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी मंजुरी देण्यात आलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय माहिती, प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशात 1482 नागरी सहकारी बँका असून, 58 मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह बँका आहेत. शेडय़ुल बँकांप्रमाणेच या सर्व बँका रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणात येतील.
देशभरातील सहकारी बँकांमध्ये 8.6 कोटी ठेवीदारांचे 4.84 लाख कोटी रुपये जमा आहेत. सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणात आल्यामुळे या ठेवी सुरक्षित राहणार आहेत.
‘पीएमसी’ बँकेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निर्णय
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) घोटाळ्यामुळे अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले होते. पीएमसी आणि इतर सहकारी बँकांतील गैरव्यवहारांचा फटका ठेवीदारांना बसतो. त्यामुळे बँक बुडाली तरी ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.
























































