सहकारी संस्थांचा लेखापरीक्षण अहवाल मराठी भाषेतच हवा, सहकार विभागाचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बापू सुळे

राज्यातील सहकारी संस्थांना आता आपला वार्षिक लेखापरीक्षण अहवाल मराठी भाषेतच तयार करावा लागणार आहे. सहकारी संस्थांचे सभासद, ग्राहक आणि हितचिंतक मराठी भाषिक आहेत. त्यामुळे संस्थांनी आपला लेखापरीक्षण अहवाल इंग्रजी भाषेत तयार केल्यास संबंधितांना त्याचा अर्थ उमगत नाही. आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती काय आहे. याचा अंदाज येत नाही. ही बाब संस्थेच्या आणि सभासदांच्या हिताला मारक ठरू शकते. त्याची गंभीर दखल घेत यापुढे सहकारी संस्थांनी आपले लेखापरीक्षण अहवाल मराठी भाषेतच तयार करावेत, असे निर्देश सहकार विभागाने दिले आहेत.

सहकारी संस्थांना आर्थिक वर्ष संपल्यानंतर एका महिन्यात किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या वर्षभरातील कामकाजाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी सहकार विभागाच्या पॅनेलवर असलेल्या लेखापरीक्षकाची निवड करण्याचा संबंधित संस्थेला अधिकार आहे. तसेच मराठी भाषेचे ज्ञान असलेल्या लेखापरीक्षकांचीच सहकार विभागाकडून पॅनेलवर निवड केली जाते. तरीही लेखापरीक्षक आणि संबंधित सहकारी संस्था आपल्या कारभारातील त्रुटी सभासद, ठेवीदार, ग्राहकांच्या निर्शनास येऊ नयेत म्हणून जाणीवपूर्वक आपला लेखापरीक्षण अहवाल इंग्रजी भाषेत तयार करतात.

त्यामुळे अनेकदा संस्थेच्या अधिकारी, पदाधिकाऱयांनाही लेखापरीक्षण अहवालावरून संस्थेच्या आर्थिक स्थितीचे आणि आर्थिक गुणदोषांचे आकलन होत नाही. परिणामी लेखापरीक्षण अहवालातील गुणदोषांची पूर्तता करताना अडचण निर्माण होत असल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्याची दखल घेत संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल सहजपणे सभासद, ग्राहक, ठेवीदार आणि हितचिंतकांना समजावा म्हणून मराठी भाषेत तयार करण्याचे निर्देश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिले आहेत.

सभासदांच्या मागणीनंतरच इंग्रजीचा वापर करावा

राज्यातील सर्व सहकारी संस्थांनी आपला लेखापरीक्षण अहवाल मराठी भाषेत सादर करणे बंधनकारक आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या सहकारी संस्थेच्या सभासदांनी वार्षिक सभेत लेखापरीक्षकांची नियुक्ती करताना जर लेखापरीक्षण अहवाल इंग्रजी भाषेत तयार करावा अशी मागणी केली असेल तरच इंग्रजी भाषेचा वापर केला जावा, असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.