कोपर्डी अत्याचार प्रकरणी आज सुनावणी, पुढील सुनावणीच्या तारखाही ठरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाची रखडलेली सुनावणी अखेर सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी 4 ऑक्टोबर रोजी ही सुनावणी सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. साधना जाधव आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी होणार असून यावेळी नियमित सुनावणीच्या तारखा ठरविल्या जाण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात इतर तांत्रिक अडचणी आणि नंतर लॉकडाऊनमुळे ही सुनावणी रखडली होती. सुनावणी सुरू करण्यासंबंधीची विनंती सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव यांनी  सप्टेंबरमध्ये न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार सुनावणीसाठी तारीख मिळाली आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. यामध्ये जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांविरुद्ध नगर जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालविण्यात येऊन 29 नोव्हेंबर 2017 रोजी 16 महिन्यांनंतर त्यांना खून आणि बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. ही फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात अर्ज केला होता. आरोपी संतोष भवाळ याने फाशीच्या शिक्षेविरोधात अपील केले. यावर प्राथमिक सुनावणीनंतर 25 फेब्रुवारी 2020 पासून नियमित सुनावणी घेण्याचे ठरले. मात्र, कोरोनाचा लॉकडाऊन लागला आणि सुनावणी लांबली. कोर्टाचे कामकाज सुरळीत झाल्याने सरकारने सुनावणी सुरू करण्याची मागणी मान्य केली आहे. सोमवारपासून पुढील सुनावणीच्या तारखा ठरविल्या जाण्याची शक्यता आहे.