पुणे शहरात रोहित्रातून तांब्याची तार चोरणारी टोळी सक्रीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पुणे शहरातील काही भागातील महावितरणच्या रोहित्रातून तांब्याची तार चोरून नेणाऱ्या चोरट्यांची टोळी सक्रीय असल्याचे उघडकीस आले आहे. बाणेर भागातील रोहित्रातून चोरट्यांनी दीड लाखांची तांब्याची तार चोरल्याची घटना उघडकीस आली. महावितरणचे सहाय्यक अभियंता मनोज नेमाडे (वय 38) यांनी चतु: शृंगी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे.

बालेवाडी-बाणेर भागातील मिटकॉन चौकात असलेल्या रोहित्राची तोडफोड करून चोरट्यांनी दीड लाखांची तांब्याची तार चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. चोरट्यांनी केलेल्या तोडफोडीमुळे रोहित्रातील तेल (ऑईल) सांडल्याने नुकसान झाल्याचे नेमाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क परिसरात चोरट्यांनी महावितरणच्या रोहित्रातून 100 किलो तांब्याची तार चोरून नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी तांब्याची तार चोरताना रोहित्राची तोडफोड केल्याने त्यातील 200 लिटर तेल सांडले होते. रोहित्रातून तांब्याची तार चोरणारी चोरट्यांची टोळी सक्रीय असल्याचे उघडकीस आले आहे.