मास्कच्या माध्यमातून करत होता कॉपी…जाणून घ्या कशी ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्कचा वापर कोरोनापासून रक्षण व्हावे याकरिता केला जातो; पण एका व्यक्तिने चक्क मास्कच्या माध्यमातून कॉपी करण्याची शक्कल लढवली आहे. बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूरमधील पानापूर धर्मपूर येथील उच्च माध्यमिक केंद्रात शिपाई भरतीची लेखी परीक्षा होती. त्यावेळी या शिपायाने त्याच्या तोंडाला लावलेल्या मास्कमध्ये एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस बसवले होते.

तोंडाला मास्क लावून परीक्षा देण्याचे स्वातंत्र्य आहे. याचाच फायदा या शिपायाने घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मास्कमध्ये डिवाईस लपवून तो परीक्षा केंद्रात घेऊन गेला आणि उत्तरपत्रिका सोडवायला बसला. पण परीक्षकांनी त्याला कॉपी करताना रंगेहाथ पकडले. त्यांनी त्याच्या तोंडाला लावलेला मास्कही तपासला. तेव्हा त्याच्या मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सापडले. त्यामुळे परीक्षकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले.

शिपाई भरतीबाबत केंद्रअधीक्षक छट्टू यादव यांनी माहिती दिली की, स्टाफ सिलेक्शन काऊन्सिलद्वारे शिपाई भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. वर्ग क्रमांक 16 मध्ये परीक्षक आशुतोष कुमार आणि मो. मुमताज यांनी एका परिक्षार्थीला मास्कमध्ये लावलेल्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसद्वारे प्रश्नांची उत्तरे शोधताना पकडले. या कॉपी करणाऱ्या परिक्षार्थीचा परीक्षा क्रमांक 4122140374 हा होता. प्रश्नपत्रिका सोडवताना तो मास्कमध्ये लावलेल्या डिवाईसच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे शोधून कॉपी करत होता. त्याची कॉपी करण्याची ही युक्ती बघून परीक्षकांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. केंद्र अधीक्षकांनी कॉपी करणाऱ्या परीक्षार्थीबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

कारण त्याच्या मास्कमध्ये बॅटरी, मोबाईल बोर्ड, सिम, चार्जर पिन असे सर्व साहित्य त्याच्या डिवाईसला जोडलेले होते. तसेच त्याच्या मास्कमधील डिवाइसला तांब्याची एक पातळ तार होती. ती त्याच्या कानाला लावलेल्या ब्ल्यू टूथला जोडलेली होती. एखाद्या स्मार्टफोनप्रमाणे ही डिवाइस काम करत होती. त्यामुळे त्याला कॉपी करणे सहज शक्य होत होते.