
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेले आठ कुटुंबीय व व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून अन्य दोन संशयितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांच्या लाळेचे नमुने संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरातील एक व्यक्ती दिल्ली येथील तबलिकी जमात मरकजल उपस्थित राहुन परत आला होता. या व्यक्तीला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर 2 एप्रिल रोजी त्याला कोरोणाची लागण झाल्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेले त्याचे कुटुंबीय व अन्य व्यक्ती अशा आठ जणांची जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पथकाने वैद्यकीय तपासणी करून थ्रोट स्वॅब नमुने घेतले होते. संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने आज चार एप्रिल रोजी याबाबतचा तपासणी अहवाल पाठवला असून आठही संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आज शनिवारी दोन संशयितांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्या लाळेचे नमुने संभाजीनगरच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.




























































