धाकधूक! कोरोनाने साहित्य संमेलनाचे सूप वाजवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर तब्बल आठ महिने लांबलेल्या नाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज (रविवारी) समारोप झाला. गेले दोन दिवस सुरळीत पार पडलेल्या साहित्य संमेलनाचा तिसरा दिवस घडामोडींचा ठरला. कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या संमेलनाला अखेर कोरोनाने गाठलेच. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी आधी दोन आणि दुपारनंतर आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यानंतर प्रशासनाने अधिक कडक पावले उचलली असून नागरिकांना मास्क लावा, अंतर पाळा अशा सूचना वारंवार देण्यात येत होत्या.

साहित्य संमेलनात गेल्या दोन दिवसात नाशिककरांसह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या हजारो नागरिकांनी येथे भेट दिली. कोरोनाचे सावट असताना देखील शक्यती सर्व काळजी घेत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस दणक्यात सोहळा पार पडला असला तरी तिस्रया दिवशी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आयोजकांची चिंता वाढली आहे.

दोन पुण्याचे, एक स्थानिक

पुण्याहून नाशिकला साहित्य संमेलनासाठी दोन जण खासगी वाहनाने दाखल झाले होते. प्रवेशद्वारावर या दोघांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात हे दोघेही पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे त्यांना बाजूला घेत त्यांचे स्वॅब घेण्यात आले आणि ते आरटीपीसीआरसाठी पाठवण्यात आले. या दोघांची तपासणी डॉ. प्रशांत भुतडा यांनी केली. यानंतर दोघेजण पुण्यात परतले. त्यांना क्वारंटाइन राहण्यास सांगितल्याचीही माहिती मिळते. दोघेही पुरुष असून त्यातील एकाने दोन्ही लस तर एकाने केवळ एक घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर काही वेळाने नाशिकच्या चांदशी भागातील एक 22 वर्षाचा तरुणही पॉझिटिव्ह आढळला. त्याला देखील क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे.

तीन रुग्ण आढळल्यानंतर नाशिककरांच्या चिंतेत वाढ झाली असली तरी समाधानाची बाब आहे की संमेलन स्थळाच्या दारावरच कोरोना थोपवण्यात प्रशासनाला यश आले आहे.