
कोरोनाच्या जागतिक संकटाने अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. अजूनही कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोना रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे सर्वजण घरातच असल्याने अनेकांची आराम करण्याची आणि झोप काढण्याची इच्छा पूर्ण झाली असणार. या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे वेळ मिळाल्याने कामाच्या ताणतणावात झोप मिळत नसल्याने अनेकांना झोप काढण्यासाठी वेळ मिळाला होता. मात्र, लोकांनी आरामही केला नाही किंवा झोपाही काढल्या नाहीत, कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे अनेकांची झोप उडाल्याचे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
वेळ मिळाल्यावर भरपूर आराम करणार किंवा फक्त झोपण्यासाठीच सुटी टाकणार, असे म्हणणाऱ्या अनेकांची झोप लॉकडाऊनच्या पहिल्याच आठवड्यात पूर्ण झाली होती, असे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. त्यानंतर घरातच अडकून पडल्याने त्यांची बेचैनी वाढली आणि झोपण्याचा प्रयत्न करूनही त्यांना झोप येत नसल्याचे सर्वेक्षणात अनेकांनी सांगितले. ब्रिटनच्या लंडनमधील किंग्ज कॉलेजने 22 ते 24 मेदरम्यान याबाबत सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणातून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांची झोप उडाल्याचे दिसून आले. तर सर्वेक्षणातील 38 टक्के लोकांनी त्यांना अशुभ किंवा घाबरवणारी स्वप्ने पडल्याचे सांगितले. काही जणांनी लॉकडाऊनच्या काळात आपण जास्तवेळ झोपत असल्याचे सांगितले. मात्र, कितीही झोप घेतली तरी थकवा जाणवत असल्याचे ते म्हणाले. ब्रिटनमध्येच 2,254 युवकांच्या सर्वेक्षणाच्या अभ्यासातून 10 पैकी 6 जणांना लॉकडाउनच्या काळात झोपेसंबंधीच्या तक्रारी किंवा त्रास झाल्याचे दिसून आले आहे. या काळात भरपूर वेळ मिळूनही त्यांना झोप येत नसल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनमुळे दोन तृतीयांळ लोकांना नोकरीबाबतची चिंता सतावत होती. तर काहीजणांना घरखर्च कसा चालवायचा किंवा आर्थिक संकटाची चिंता असल्याने अनेकांची झोप उडाल्याने सर्वेक्षणातून दिसून आले आहे. झोपेच्या वेळेबाबत केलेल्या अभ्यासातून लॉकडाऊनच्या काळात अनेकांची झोपण्याची वेळ 15 मिनिटांनी तर फ्रान्समधील नागरिकांची झोपण्याची वेळ 20 मिनिटांनी वाढल्याचे दिसून आले.
लॉकडाऊनचे प्रत्येकावर दीर्घकालीन परिणाम होणार असल्याचे यासर्वेक्षणाच्या निष्कर्षातून संशोधकांनी सांगितले आहे. लॉकडाऊननंतरही जनजीवन पूर्वपदावर येणार नाही. लॉकडाऊननंतरही काही निर्बंधासह राहवे लागणार आहे. या अनिश्चित परिस्थितीमुळे प्रत्येकाची मनात अनाकलनीय भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. तसेच ताणतणाव, चिडचिडेपणा, राग येणे याचाही झोपवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे परिणाम दीर्घकाळ राहतील, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.




























































