कोरोना 100 वर्षांतील सर्वात मोठे आर्थिक संकट, शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना’ हे गेलया शंभर वर्षातील सर्वात मोठे आरोग्य आणि आर्थिक संकट असून, हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर आघात झाला आहे, अशी चिंता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली. कोरोना लॉकडाऊनमुळे मागणी कमी झाली आणि उत्पादन घटले. औद्योगिक चाके मंदीत रूतली. जागतिक मागणी, मुल्य साखळी, कामगार आणि भांडवली चळवळ यांना कोविड-19 व्हायरसने खिळखिळे करून टाकले असे दास यांनी म्हटले आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बलाढय़ बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) 7 व्या बँकिंग अँड इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये गव्हर्नर दास बोलत होते.

आर्थिक स्थैर्य ठेवण्याचे आरबीआयसमोर आव्हान
– कोरोना काळात आर्थिक स्थैर्य ठेवण्याचे शिखर बँक म्हणून आरबीआयसमोर आव्हान असल्याचे गर्व्हनर दास यांनी सांगितले.
– या काळात रिझर्व्ह बँकेने काही पावले उचलली. फेब्रुवारी 2019 पासून रेपोरेट 1.35 टक्क्यांनी कमी केला आहे.
– 9 लाख कोटी रूपयांची रोकड उपलब्ध केली.
– सुरूवातीला मार्च ते मे असे तीन महिने आणि नंतर आणखी तीन महिने ईएमआय वसुलीला स्थगिती दिली आहे.
– बँकांना पतपुरवठा वाढविला जात आहे. कर्ज वितरणात चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

‘पीएमसी’बँकेची पुर्नरचना
संकटात सापडलेल्या बँका, वित्त संस्थेतील ठेवीदारांच्या हिताचे रक्षण ही प्राथमिकता आहे. त्याचबरोबर बँकांना पुन्हा उभे करण्यासाठी खासगी-सार्वजनिक भागीदाराचा पर्याय स्वीकारण्यात येत आहे. येस बँकेत हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. त्याप्रमाणे पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेची पुर्नरचना केली जाईल. येस बँकेचे मॉडेल ‘पीएमसी’ बँकेतही राबविण्यात येईल असे गर्व्हनर दास यांनी सांगितले.