
कोरोनाच्या दुसऱया लाटेत झपाटय़ाने वाढणारी रुग्णसंख्या आता नियंत्रणात येत असतानाच उत्तर मुंबईतील ‘झोन -7’मध्येही कोरोना आटोक्यात येत आहे. दहिसर, बोरिवली आणि कांदिवलीत आठवडाभरापूर्वी दररोज 1200 ते 1400 पर्यंत आढळणारी रुग्णसंख्या आता 900 ते एक हजारापर्यंत खाली आहे. दररोज अडीच हजारांवर होणाऱया चाचण्या, लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर तातडीने उपचार आणि क्वारंटाइन सुविधा यामुळेच आता रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे ‘झोन-7’चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले.
उत्तर मुंबईच्या टोकाला असणारे आर उत्तर दहिसर, आर मध्य बोरिवली आणि आर दक्षिण कांदिवली कोरोना हॉटस्पॉट बनले होते. मात्र पालिकेने सर्वेक्षण, सोसायटय़ांवर चाचणी शिबीर, वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून चाचण्या, रुग्णांना मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा दिल्याने आता रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नियमांची कठोर अंमलबजावणी
सद्यस्थितीत या ठिकाणी चाळी-झोपडपट्टय़ांमध्ये 42 कंटेनमेंट झोन आणि 108 इमारती सील आहेत. मास्क न वापरणाऱयांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. कोरोना खबरदारीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याच उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले. या विभागत 13 ठिकाणी लसीकरणही सुरू आहे.
झोपटपट्टय़ांपेक्षा इमारतींमध्येच सर्वाधिक रुग्ण
संपूर्ण मुंबईप्रमाणे झोन-7 मध्येही झोपडपट्टय़ांपेक्षा इमारतींमध्येच सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या 90631 रुग्णांमध्ये इमारतींमध्ये आढळणाऱया रुग्णांचे प्रमाण तब्बल 92.28 टक्के आहे. तर चाळी–झोपडपट्टय़ांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण 8.10 टक्के आहे.
73 हजार जणांनी कोरोनाला हरवले
- दहिसर, बोरिवली आणि कांदिवलीत आतापर्यंत वर्षभरात 91 हजार 389 कोरोनाबाधित आढळले आहेत.
- यातील 73 हजार 269 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- तिन्ही प्रभागांत मिळून सद्यस्थितीत 16503 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 1617 जणांचा मृत्यू झाला आहे.






























































