बांगलादेशमध्ये कोरोनाचे थैमान; देशात 7 दिवसांचा लॉकडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू झाले आहे. अनेक देशांमध्ये बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. हिंदुस्थानी उपखंडातील देशांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हिंदुस्थानचा शेजारी देश बांगलादेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. कोरोनाच्या या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने सोमवारपासून देशभरात एक आठवडय़ासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. शनिवारी बांगलादेशमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे 58 जणांचा मृत्यू झाला, तर 24 तासांमध्ये 5683 नवीन कोरोनाबाधित आढळले. मार्च 2020 पासूनची ही तिसऱया क्रमांकाची सर्वाधिक बाधितांची संख्या आहे. सोमवारी संपूर्ण देशामध्ये एक आठवडय़ाचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करता येईल, अशी माहिती बांगलादेशचे परिवहन मंत्री ओबैदुल कादर यांनी ढाका येथे दिली.