मुंबई विभागामुळे दहावीच्या निकालास उशीर? अंतर्गत मूल्यमापनाची मुदत संपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विभागीय शिक्षण मंडळामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालास उशीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्याची शाळांना देण्यात आलेली मुदत बुधवारी संपली. मात्र तरीही काही तांत्रिक अडचणींमुळे मुंबई विभागीय शिक्षण मंडळातील 17, तर राज्यातील 10 टक्के शाळांच्या निकालाचे काम अद्याप शिल्लक आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून 9 जून रोजी राज्यातील दहावीच्या निकालाची कार्यपद्धती आणि त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्या वेळापत्रकानुसार 11 जूनपासून मुख्याध्यापक, शिक्षकांना दहावीच्या निकालाचे कामकाज पूर्ण करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण बोर्डाने दिलेल्या लिंकवर भरणे आवश्यक आहे. मात्र मुंबई विभागीय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱा शाळांमध्ये निकाल आणि त्यासाठीची माहिती संकलित करण्यासाठी उशीर झाला आहे. त्यामुळे मुंबई विभागीय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत तब्बल 17 टक्के निकालाचे कामकाज होणे बाकी आहे.

मुंबई आणि परिसरातील शिक्षकांना लोकल प्रवास मिळाला नसल्याने अनेक शिक्षकांना आपल्या शाळांमध्ये पोहोचता आले नाही, तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक शाळांतील माहिती मिळण्यास उशीर झाला असल्याने मुंबई विभागीय शिक्षण मंडळातील निकालाचे कामकाज मोठय़ा प्रमाणात रखडले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लागण्यास उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लिंक काम करीत नाही

विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी बोर्डाने जी लिंक शाळांना दिली आहे ती नीट काम करीत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. मुख्याध्यापक रात्रभर जागून गुण अपलोड करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत निकालाचे काम वेळेवर कसे होणार? असा सवाल शिक्षक करीत आहेत.