गोव्यात पॅकअप! ‘शो मस्ट गो ऑन’ निर्बंधांमुळे संकटात

कोरोनाच्या काढत्या रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातदेखील चित्रपट, मालिकांच्या शूटिंगवर बंदी घातली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून शूटिंगसाठी गोव्यात गेलेल्या जवळपास 20हून अधिक हिंदी, मराठी मालिका संकटात सापडल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी निर्मात्यांकडून आता पुन्हा नवीन लोकेशनसाठी शोधाशोध सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात साधारण तीन आठवडय़ांपासून चित्रपट, मालिकांच्या शूटिंगवर बंदी आहे. त्यामुळे मराठीसह हिंदी मालिकांचे शूटिंग सध्या गोवा, दमण, सिलवासा, जयपूर, बेळगाव आदी ठिकाणी सुरू आहे. त्यात निर्मात्यांची सर्वाधिक पसंती होती ती गोव्याला. झी मराठीवरील ‘पाहिले न मी तुला’ आणि ‘अगंबाई सूनबाई’, स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘रंग माझा वेगळा’, कलर्सवरील ‘सूर नवा, ध्यास नवा’ या मालिकांचे शूटिंग गोव्यात सुरू होते. मात्र कोरोनाचा कहर वाढल्याने गोव्यात शूटिंगवर निर्बंध घातल्यामुळे या मालिकांचे शूटिंग रखडले आहे. सध्या ‘पाहिले न मी तुला’ आणि ‘अगंबाई सूनबाई’ची टीम गोक्यातून मुंबईत परतली असून या मालिकांची पुढील शूटिंग दमण आणि सिल्वासाला होणार असल्याचे कळते.

हिंदी मालिकांचे ‘केट अँड कॉच’

गोव्यात तब्बल 11 हिंदी मालिकांचे शूटिंग सुरू होते. त्यात ‘कुमकुम भाग्य’, ‘गुम है किसी के प्यार में’, ‘आपकी नजरो में’, ‘शौर्य और अनोखी की कहानी’, ‘कुंडली भाग्य’, ‘यह है चाहते’, ‘अपना टाईम भी आएगा’ आदी मालिकांचा समावेश आहे. शूटिंग बंद असले तरी बहुतेक मालिकांची टीम गोव्यातच तळ ठोकून आहे. झी टीव्हीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘सध्यातरी आमच्याकडे एपिसोड बॅंक आहे. पुढील शूटिंगसाठी आम्ही रीतसर परवानगी मागितली असून परवानगी मिळेल अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे तूर्तास तरी आमच्या मालिकांची टीम गोव्यातच आहे.’’

जाहिरातींना फटका

नवीन भागांचे शूटिंग न झाल्यास नाइलाजास्तक वाहिनीला मालिकांचे जुने भाग पुन्हा दाखवावे लागतात. मालिकांचे जुने भाग पुन्हा पाहण्यास प्रेक्षकांना फारसा रस नसतो. त्यामुळे याचा फटका थेट जाहिरातींना आणि टीआरपीला बसतो.

आपली प्रतिक्रिया द्या