विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने बंद शाळा पुन्हा बहरल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा बहरल्या. राज्यातील शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू झाले असून आज पहिल्याच दिवशी शिक्षक, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळाशाळांमध्ये रांगोळ्यांच्या पायघडय़ा होत्या तर कुठे सनई, ढोल-ताशांच्या गजरात फुगडय़ा, पारंपरिक लेझीम खेळून विद्यार्थी शाळेत दाखल झाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव आणि त्यांचे औक्षण करून शाळेत स्वागत केले. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पनवेल परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण अधिक होते. शाळेत जाण्याचा, दीड वर्षानंतर आवडीचे शिक्षक, वर्गमित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱयावरून ओसंडून वाहत होता. अनेक शाळांतून विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याची शपथ घेतली. अभ्यासाबरोबरच मास्क, लावणे, हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे नियमित पालन करण्याच्या सूचना यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.

हजेरीच्या सक्तीमुळे शिक्षकांचा विनातिकीट लोकल प्रवास

मुंबई आणि परिसरात राहणाऱया शिक्षकांना शाळेच्या पहिल्याच दिवशी लोकल प्रवासाचा फटका बसला. ज्या शिक्षकांचे कोरोना लसीचे दोन डोस झालेले नाहीत त्यांना लोकलची तिकीटच मिळाले नाही. काही शिक्षकांचे तिकीट काऊंटरवर रेल्वे कर्मचाऱयांसोबत खटके उडाले. अनेकांनी तर वेळेवर शाळा गाठण्यासाठी विनातिकीटच प्रवास केला. शिक्षकांबरोबरच अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनादेखील लोकलने प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

आता रिचार्ज आणि नेटवर्पचे टेन्शन नाही, वर्गात येऊन शिकण्याकडे कल

मुंबई आणि परिसरात राहणाऱया अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन लेक्चरवेळी मोबाईल कनेक्टिव्हिटी, रिचार्ज आणि नेटवर्पचे टेन्शन होते, पण आता शाळेत येता येणार असल्याने विद्यार्थ्यांची अशा अनेक अडचणींतून सुटका झाली आहे. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये दोन भावंडांमध्ये एकच अॅण्ड्रॉईड फोन असल्याने एकाच वेळी दोघांचीही ऑनलाइन शाळा सुरू झाल्यास मोठी समस्या येत होती, पण आता त्यापैकी एकाची शाळा सुरू झाल्याने अनेक कुटुंबांतील अभ्यासातली मोठी अडचण दूर झाली आहे. गोवंडी येथील अमरनाथ हायस्पूलमध्ये शिकणाऱया हर्षदा सनगर या नववीतील विद्यार्थिनीने ऑनलाइनमुळे सतत मोबाईलसमोर बसल्याने डोळ्यांना होणारा त्रास आता थांबणार आहे, असे सांगितले. मोबाईल नेटवर्प अथवा रिचार्ज नसल्याने अनेक वेळा शाळा जॉईन करता येत नव्हती, असेही ती म्हणाली.