जबाबदारीचे भान ठेवून लवकरच लोकलचा निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना चांगलाच आटोक्यात आला असला तरी संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे ‘सर्वांसाठी लोकल’ सुरू करण्यासंदर्भात जबाबदारीचे भान ठेवूनच निर्णय घ्यावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मांडली. सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासंदर्भात लवकरच जनतेशी संवाद साधून निर्णय जाहीर केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे ‘ठरावीक वेळे’त सर्वांसाठी सुरू केलेली मुंबई लोकल सद्यस्थितीत फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱयांसाठीच मर्यादित करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आल्यामुळे ‘सर्वांसाठी लोकल’ कधी सुरू होणार, असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास सुरू करावा, अशी मागणीही जोर धरत आहे. ‘सर्वांसाठी लोकल’ सुरू करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. पालिकेच्या वांद्रे पश्चिम नव्या वॉर्ड ऑफिसच्या लोकार्पणप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. मुंबई आणि इतर ठिकाणी कोरोना स्थिती संमिश्र स्वरूपाची आहे. काही ठिकाणी कोरोना स्थिती उत्तम आहे, पण काही ठिकाणी अजूनही चिंता करण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे सर्वांना काळजी ही घ्यावीच लागेल. निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कृपा करून संयम सोडू नका!

मुंबईसह राज्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. नागरिकांच्या जिवाची काळजी घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आपण जिथे निर्बंधांमध्ये शिथिलता देऊ शकलो नाही त्या नागरिकांनी, व्यापाऱयांनी कृपा करून संयम सोडू नये. जिथे शक्य आहे तिथे आपण निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. जिथे शिथिलता देऊ शकलो नाही तिथे नाइलाज आहे. पण याचा अर्थ असा नाही की, बंद म्हणजे कायमच बंद आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापारी आणि नागरिकांना केले.