
‘कोरोना’वरील लसचा शोध लागल्यास संसर्ग नियंत्रणात येईल. पण या विषाणूने अवघ्या जगाची अर्थव्यवस्था अक्षरशः पोखरून टाकली आहे. त्यामुळे सावरायला काही वर्षे लागतील. येत्या दोन वर्षात हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला तब्बल 31.5 लाख कोटींचा फटका बसेल असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय)वर्तविला आहे.
स्टेट बँकेच्या ‘इकॉरॅप’ अहवालात ही चिंता व्यक्त केली आहे. दोन वर्षे कोरोनाचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर राहिल. 2021 मध्ये यात 5.4 टक्क्यांपर्यंत वाढ होईल. जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान 12.5 ट्रिलियन डॉलर एवढे प्रचंड असेल. त्यात हिंदुस्थानला 438 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 13.5 लाख कोटी) फटका बसेल. जागतिक अर्थव्यवस्थेत हिंदुस्थानचे योगदान 3.5 टक्के आहे असे अहवालात म्हटले आहे.
… तर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास 4 वर्षे लागणार
कोरोनाचा प्रभाव दोन वर्षे अर्थव्यवस्थेवर राहिल. 2021मध्ये हिंदुस्थानच्या जीडीपी दरात 6.8 टक्क्यांची घसरण होईल, असा अंदाज स्टेट बँकेच्या इकोरॅप अहवालात यापूर्वीच व्यक्त केला होता. 2022 मध्ये अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र, ही सुधारणा झाली नाही तर देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास 4 वर्षे लागतील. तसेच दरडोई उत्पन्नात 2021 मध्ये 5.4 टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज आहे.


























































