कांजण्यांसारखा पसरू शकतो डेल्टाचा संसर्ग! कोरोनाच्या घातक व्हेरिएंटबाबत नवा इशारा

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग कांजण्यासारखा झपाटय़ाने पसरू शकतो. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाही या व्हेरिएंटपासून संसर्गाचा धोका आहे. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट अत्यंत घातक आणि सर्वाधिक संसर्गजन्य आहे, असे अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) अभ्यासात आढळले आहे. या अभ्यासातील काही धक्कादायक निष्कर्षांचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे हिंदुस्थानसह संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच अनेक देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सीडीसीने यासंदर्भात सखोल अभ्यास केला. त्यातून डेल्टा व्हेरिएंटच्या गंभीर बाबींचा उलगडा झाला आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लस न घेतलेल्या लोकांप्रमाणेच डेल्टा व्हेरिएंटची बाधा होऊ शकते. डेल्टा हा लस घेतलेल्या लोकांच्याही नाक आणि गळ्यापर्यंत अत्यंत सहज व वेगाने शिरकाव करू शकतो. कांजण्यासारखा झपाटय़ाने पसरणारा हा घातक व्हेरिएंट आहे, असे सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल पी. व्हालेन्स्की यांनी म्हटले आहे. या व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्याचे काही उपाय आहेत, त्याचे सर्वांनीच काटेकोर पालन केले पाहिजे. नाक-तोंडाला मास्क लावण्याची सक्त गरज आहे. शाळेत विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचाऱयांनी मास्क लावलाच पाहिजे, असेही डॉ. व्हालेन्स्की यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या