पालिका रुग्णालयांतील कोरोना बेडची क्षमता 1 लाखापर्यंत वाढवणार

644

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात सध्या 50 हजार कोरोना बेड असून वाढती रुग्णसंख्या पाहता येत्या काही दिवसांत ही बेड क्षमता 1 लाखापर्यंत वाढवणार आहोत, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली. चहल यांनी आज शीव रुग्णालयातील कोरोना वॉर्डला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये आणि कर्मचारी महत्त्वाची भूमिका निभावत असून दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्याचबरोबर अनेक पालिका रुग्णलयात कोरोना वॉर्ड तयार करण्यात आले असून ही संख्या वाढवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, रुग्ण वाढले तरी पालिका रुग्णालये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात कमी पडणार नाहीत. सद्या पालिका रुग्णालयात 50 हजार कोरोना बेड असून येत्या काळात ही क्षमता वाढवून ती लाखापर्यंत केली जाईल, असे स्पष्ट केले. कोरोना रुग्ण व त्यांच्यावर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पालिकेच्या सर्व रुग्णालयांना आवर्जून भेटी देत असल्याचे महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितले. चहल यांनी शीव रुग्णालयातील कोरोना वॉर्डला भेट देऊन रुग्ण आणि आरोग्य तसेच कर्मचाऱ्यांची वैयक्तिकरित्या विचारपूस केली. कोरोनाबाधित रुग्ण तसेच परिचारिका व पॅरामेडिकल स्टाफ यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांच्या काय सूचना आहे, आरोग्य सुविधांमध्ये काय सुधारणा करणे शक्य आहे? हे त्यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त  (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी,  राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी तसेच समितीचे सदस्य तथा बॉम्बे रुग्णालयाचे डॉक्टर गौतम भन्साळी उपस्थित होते.

अतिदक्षता विभागात कॅमेरे लावण्याचा विचार

अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू युनिट) कॅमेरे लावून पालिकेच्या कंट्रोल रूममधून त्याचे नियंत्रण करणे शक्य आहे का, तसे शक्य असेल

तर तसे करण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती चहल यांनी दिली. खासगी रुग्णालयांनी आपले अतिदक्षता कक्ष महानगरपालिकेस वापरण्यास मुभा दिली असून यामुळे येथील खाटा मोठ्या संख्येने वापरण्यास मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बीकेसीतील कोरोना केंद्र उद्यापासून सुरू

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात येत्या मंगळवारपासून कोरोना केंद्र सुरू होणार असल्याची माहिती, चहल यांनी दिली. बीकेसी’त उभारल्या जाणार्‍या सेंटरची क्षमता एक हजार बेडची आहे. मात्र, पुढे ही क्षमता 5 हजारांपर्यंत वाढवता येणार आहे. यात 500 बेडवर ऑक्सिजन उपलब्ध असतील. यामध्ये नॉनक्रिटिकल केसेसवर उपचार आणि क्वारेंटाइनची सुविधा दिली जाणार आहे. याचा पूर्ण खर्च ‘एमएमआरडीए’ करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या