नवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील

5573

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रहिवाशांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे डोंबिवली तसेच नवी मुंबईतील संवेदनशील परिसर सील करण्यात आला आहे. या भागाकडे येणारे सर्व रस्ते बंद केले असून नागरिकांनी बाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान रहिवाशांना भाजीपाला, दूध तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू महानगरपालिकेच्या वतीने पुरवण्यात येणार आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पंधराहून अधिक कोरोना बाधित रुग्ण असून डोंबिवलीतील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. शहरात सर्वत्र लॉकडाउन असतानादेखील काहीजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत.तसेच रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे नाईलाजाने पालिकेने राजाजी पथ, बालाजी गार्डन, आयरे रोड, विजय नगर, म्हात्रे नगर, सहकार नगर तसेच कोपर रोड स्टेशन झोपडपट्टीचा परिसर सील केला आहे.

सर्व्हेक्षण करणार

दरम्यान परिसर सील केलेल्या भागात राहणाऱ्या रहिवाशांना महानगरपालिकेच्या वतीने सर्व वस्तूंचा पुरवठा करण्यात येईल अशी ग्वाही आयुक्त सूर्यवंशी यांनी दिली आहे. महापालिकेचे आरोग्य व भरारी पथक डोंबिवली पूर्वेतील परिसराचा तातडीने सर्व्हे करणार असून कुणाला कोरोनाची बाधा झाली आहे काय याची तपासणी करणार आहेत.

नियम कठोरपणे पाळा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रमाणे नवी मुंबई पालिकेने देखील खबरदारी घेतली आहे. आज सकाळी नेरूळमधील सेक्टर २७ व २८ सील केले आहे. याच भागात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याने महापालिकेने नेरूळमधील काही भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्तांनी सर्व रहिवाशांना कठोर नियम पाळावे असे बजावले आहे

आपली प्रतिक्रिया द्या