#corona पोलीस जवान म्हणतो लग्नाला येऊ नका, लग्न पुढे ढकलले आहे!!

1009

कोरोनाचं थैमान आता हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रातही येऊन पोहोचलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय आणि उपचारांसाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेला सतर्क राहून सर्वतोपरी साहाय्य करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत एका पोलीस जवानाने आपले लग्न पुढे ढकलले आहे.

चंद्रपूर येथील एका पोलीस जवानाचे लग्न जुळले. लग्नापूर्वी होणारे सर्व सोपस्कारही उरकले गेले. नातेवाईक, दोस्तांना लग्नपत्रिका दिल्या गेल्या. आता मात्र लग्नाला येऊ नका..! लग्न पुढे ढकलले आहे, असा संदेश भावी नवरदेवाकडून नातेवाईकांना मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस जवानाने खबरदारी म्हणून लग्न स्थगित केले आहे. कोरोनाचे संकट टळल्यावर पुढील मुहूर्त काढण्यात येणार आहे.

देशात हाहाकार घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने प्रत्येकजण काळजी घेतांना दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा उपपोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस जवान हेमराज किसन गुरनुले यांनी लग्नाला स्थगिती दिली आहे.

हेमराज यांचे मुल तालूक्यातील फिस्कूटी गावातील पायल राघोजी कावडे हिच्याशी लग्न ठरलं. 29 मार्च रोजी हा विवाह सोहळा सपन्न होणार होता. दोन्ही परिवारांनी लग्नाची जय्यत तयारी सुरू केली होती. अगदी लग्नपत्रिका छापून त्या आप्तेष्टांना वाटण्यातही आल्या. मात्र, आता लग्न स्थगित झाल्याचे संदेश दोन्ही परिवार नातेवाईंकाना पाठवित आहेत. कोरोना विषाणूचा संभाव्य धोका टाळण्यासाठी दोन्ही परिवारांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे संकट टळल्यावर लग्नाचा मुहूर्त काढण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या