कोरोनामुळे अनेक लग्नसोहळे रद्द झाल्याने किंवा पुढे ढकलल्याने लग्नसराई संबंधित उद्योगांवर अवलंबून असलेल्या लोकांची उपासमार होत आहे. नोव्हेंबरनंतर पुन्हा लग्नसोहळे सुरू होतील. या पार्श्वभूमीवर सरकारने लग्न सोहळ्यांसाठी आतापासूनच नवी नियमावली जाहीर करावी, अशी मागणी बॉम्बे कॅटरर्स असोशिएशनने केली आहे.
मुंबईतच दरवर्षी 2 लाख लग्नसोहळे होतात. मुंबईतील एकूण लग्नसराई बाजारपेठ ही अंदाजे आठ कोटी रूपयांची आहे. परंतू कोरोनाचा फटका ऐन सीजनच्या मोसमात लग्नसराईशी संबंधित बाजारपेठांना बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळ्यासाठी सध्या केवळ 50 जणांना परवानगी दिली आहे. मर्यादित स्वरूपाच्या लग्नसोहळ्यामुळे कॅटरिंग, डेकोरेशन्स, बँक्केट्स, ब्युटिशियन्स, इव्हेंट मॅनेजर्स, ज्वेलर्स, बॅण्डवाले, पत्रिका छपाई, कपडे, मिठाई आदी बाजारांवर याचा थेट परिणाम होत आहे. अनेक अशिक्षित लोकांचे तसेच अकुशल कामगारांचे रोजगार बुडाले आहेत.
लग्नाचे प्लॅनिंग हे 4 ते 10 महिने अगोदर केलेले असते. म्हणून आमची सरकारला विनंती आहे की आतापासूनच त्यांनी नोव्हेंबरनंतर होणार्या लग्नसोहळ्यांसाठी नियमावली तयार करावी. जेणेकरून पुढचा सीजन वाया जाणार नाही. सुरक्षिततेच्यादृष्टीने कामगारांना प्रशिक्षण देण्याचीही आमची तयारी आहे. – योगेश चंद्रना, अध्यक्ष, बॉम्बे कॅटरर्स असोसिएशन

























































