
कोरोना महामारीत जग सावरत असतानाच चीनने पुन्हा जगाची चिंता वाढवली आहे. चीनच्या अनेक शहरांमध्ये डेल्टाक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना संसर्गात झपाटय़ाने वाढ झाली आहे. हा वाढता संसर्ग वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी चीनच्या अनेक शहरांत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
चीनमध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे पाच हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. यातील बहुतांश रुग्णांमध्ये डेल्टाक्रोनची लक्षणे दिसली आहेत. हा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर फैलावू शकतो आणि कोरोनाची नवीन लाट धडकू शकते, या भीतीने चीनच्या सरकारने तीन कोटींहून अधिक जनतेवर कडक निर्बंध लादले आहेत. जगात सर्वप्रथम चीनमध्येच कोरोनाचा फैलाव झाला होता. इथे पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. चीनसह सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरियात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. दक्षिण कोरियात एकाच दिवसात तब्बल चार लाख रुग्ण वाढले. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही सावधानतेचा इशारा दिला आहे.




























































