कोरोनामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठप्प

राज्यात सुरू असलेल्या लोकांमुळे गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे युद्धपातळीवर सुरू असलेले काम सुद्धा ठप्प झाले आहे. गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वी 23 कि. मी. अंतराचे काम पूर्ण करण्यात येणार होते. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन केल्याने या महामार्गाचे काम अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम दोन महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले आहे. प्रथम मार्गताम्हाने ते चिखली पर्यंत या कामाला सुरुवात करण्यात आली. देवघर ते गिमवी दरम्यान मोठ्याप्रमाणात रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले. काही ठिकाणी सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता देखील बनवण्यात आला आहे. रस्त्याच्या एका बाजूला खोदाई करण्यात येत होती, तर काही ठिकाणी भराव टाकण्याचे काम सुरू होते. पावसात खोदाईमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य होऊ नये यासाठी संबंधित ठेकेदाराने मेपर्यंत 23 किमी अंतराचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने जोरदार यंत्रणा कामाला लावली.

दरम्यान, रस्त्याच्या जोरदार सुरू असलेल्या कामामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व वाहन चालकांना लाल मातीच्या धुरल्याचा त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास लवकरच संपेल व महामार्गाचे काम पूर्णत्वाला जाईल अशी सगळ्यांनाच अशा वाटत होती. परंतु, कोरोनाचा फटका या महामार्गाच्या कामाला बसला. सध्या देशभर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन केल्याने गुहागर – विजापूर महामार्गचे काम बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या केवळ काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या कामावर पाणी मारण्याचे कामच सुरू आहे. तर रुंदीकरणासाठी व रस्ता बनवण्यासाठी आलेली यंत्रणा सध्या उभे असलेली पहावयास मिळत आहे.

येत्या काही दिवसात कोरोनाचे संकट न मिटल्यास गुहागर व चिपळूण मार्गावरील प्रवासी व वाहनधारकांना पावसातून प्रवास करताना धोक्याचे ठरणार आहे. करण, सद्या लाल मातीचा धुरळा उडतो म्हणून ठेकेदाराने रस्त्यावर मारलेल्या पाण्यामुळे चिखल होऊन वाहने पलटी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या