कोरोनापासून बचाव हवा आहे? मग ‘या’ सवयी तत्काळ सोडा

2107

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनापासून बचावासाठी सगळी प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात राहणं हा एक उत्तम उपाय आहे. शिवाय काही अशाही सवयी आहेत, ज्या तत्काळ सोडून दिल्याने या विषाणूचं संक्रमण रोखणं शक्य आहे.

यातली पहिली सवय ही बहुतेक लोकांना असते. ती सवय म्हणजे नखं खाण्याची. नखांच्या आत अनेक प्रकारचे विषाणू असतात. हात धुतल्यानंतरही नखांमध्ये कधीकधी विषाणू तसेच राहतात. नखं खाण्याने ते नखांतून पोटात जातात. त्यामुळे नखं खाण्याची सवय घातक ठरू शकते. दुसरी सवय म्हणजे मुरुमे किंवा अॅक्ने फोडणं ही आहे. अनेकांना सध्या पार्लरमध्ये जाता येत नसेल. त्यामुळे ज्यांना मुरुमांचा त्रास होतो त्यांनी मुरुमांना वारंवार स्पर्श करणं किंवा ते फोडणं टाळलं पाहिजे. त्यामुळे हातावरचे विषाणू तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात.

अनेकांना विशेषतः स्त्रियांना केसात हात फिरवण्याची सवय असते. बोटांनी केसांमधून हात फिरवण्याने केसांमधील जंतू हातांवर येऊ शकतात आणि मग ते नाक किंवा तोंडाच्या साहाय्याने शरीरात प्रवेश करू शकतात. आपल्यापैकी अनेक जणांना बाथरूममधल्या वॉश बेसिनवर टूथब्रश आडवे ठेवायची सवय असते. ती सवय अत्यंत घातक आहे. कारण त्यामुळे टूथब्रश ओला राहतो आणि ओल्या भागात जंतूंचा प्रादुर्भाव अधिक होत असतो. त्यामुळे टूथब्रश नेहमी उभा ठेवावा.

आपण टूथब्रशने रोज दात घासत असलो तरी अनेकदा दातात अडकलेलं अन्न आपण हाताना काढायचा प्रयत्न करतो. ही सवयही चुकीची असून त्याने दातांचं आरोग्य बिघडू शकतं आणि अन्यही काही विषाणू तोंडात जाऊ शकतात. या सवयींखेरीज चादरी न धुता सतत दोन आठवड्यांपर्यंत वापरणंही अत्यंत घातक ठरू शकतं. तसंच सध्याच्या परिस्थितीत अन्नपदार्थ शेअर करून खाण्यानेही विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या