कोरोनाचा जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिरकाव, खबरदारी म्हणून बंद

426

जालना शहरात मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच बरोबर आता ग्रामीण भागातही कोरोना शिरकाव केला आहे. त्यामुळे उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात कुठे गाव बंद, तर कुठे जनता कफ्र्यु असे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये जालना, बदनापूर, घनसावंगी, अंबड, परतुर, मंठा, जाफराबाद, भोकरदन तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे.

जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील साठेनगरातील एका संशयिताचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गावात पहिलाच रुग्ण आढळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती पसरली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माहोरा ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान बंदचे आवाहन करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यासह दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पीआय अभिजित मोरे यांनी सांगितले. डॉ. खेडेकर साठेनगर सील करत कंटेलमेंट झोनच्या उपाययोजना करत असल्याचे सांगितले.

भोकरदन तालुक्यातील धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या अँटिजन टेस्टमध्ये शनिवारी वडोद तांगडा येथील ४६ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यामुळे बाधिताच्या संपर्कातील संशयितांना डॉ. अशोक वाघमारे यांनी भोकरदन येथील अलगीकरण कक्षात पाठवले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तीन दिवस गावात जनता कफ्र्यु पाळण्याचे आवाहन सरपंच रामधन मुराडे, ग्रामसेवक मदन ओफळकर यांनी केले आहे.

सॅनिटायझर फवारणी व घरोघरी रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.पी. वाघमारे यांनी दिली. तसेच धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विनामूल्य कोरोना टेस्ट करण्यात येत असून अर्ध्या तासात अहवाल प्राप्त होत आहे. यामुळे परिसरातील सर्वांनीच आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. वाघमारे यांनी केले आहे.

अंबड तालुक्यातील सुखापुरीत पुन्हा एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे संपर्कातील लोकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. डी. सोनटक्के यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचायत समिती उपसभापती रईस बागवान, पाशामियाँ देशमुख, प्रताप राखुंडे, दत्तात्रय राखुंडे, ग्रामसेवक कैलास कल्याणकार, तलाठी अश्विनी देशमुख, राजू लहुटे, रमेश लहुटे आदी गावांत जनजागृती करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या