शरीर, मन सृदृढ ठेवा, कोरोनासारख्या 56 विषाणूंना पळवा! 81 वर्षीय ‘स्ट्राँगमॅन’ दरेकर सरांचा नागरिकांना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीने आपल्याला गेल्या दोन वर्षांत फार मोठे झटके दिले आहेत. पण जगावर आणि मानवजातीवर अशी अनेक संकटे आली आणि गेली. कोरोनाचेही तसेच आहे. नियम पाळा. शरीर व्यायाम आणि सकस आहाराने सुदृढ ठेवा. मन प्रसन्न व सकारात्मक ठेवा. मग बघा कोरोनासारखे 56 विषाणू आपण पळवून लावू, असा मोलाचा सल्ला 81 वर्षांचे ‘व्यायाममहर्षी’ आणि ‘पॉवरलिफ्टिंग महर्षी’ मधुकर दरेकर यांनी नागरिकांना दिला आहे.

मानवी शरीर ही निसर्गाने आपणा मानवजातीला दिलेली बहुमूल्य देणगी आहे. ती जपणे आणि आयुष्य निरोगी जगणे आपल्या हातात असते. आपल्या उदात्त परंपरेने दिलेल्या योगा, सूर्यनमस्कार आणि आसनांचा आविष्कार रोजच्या जीवनात अंगिकारा. मन आणि शरीर सुदृढ राखा या महामारीवर आपण लवकरच पूर्ण विजय मिळवू, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

कोरोना काळातही रोज पहाटे उठून घरीच योगा, सूर्यनमस्कार आणि व्यायाम करण्याचा मधुकर दरेकर यांचा नित्यक्रम सुरूच आहे. व्यायामशाळा बंद असल्याने ते आपल्या शरीरसौष्ठव, वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंगच्या शिष्यांना फोनवरूनच रोज अनेक तास मार्गदर्शन करीत असतात.

  • कोरोनाचा विषाणू आधी तुमच्या शरीरावर हल्ला करतो आणि नंतर तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवून तुम्हाला अंथरुणाला खिळवून ठेवतो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही निकोप निरोगी राखणे हाच कोरोनाला दूर ठेवण्याचा रामबाण उपाय ठरू शकतो.
  • सुदृढ निकोप शरीर, सकस आहार, प्रसन्न सकारात्मक भावना आणि आजार टाळण्यासाठीचे प्रतिबंध ही चौसूत्री अमलात आणलीत तर कोरोनाच काय, कुठलाच संसर्गजन्य आजार तुमच्या वाटेला जाणार नाही.

प्रोटीन सप्लिमेंट, स्टेरॉईडच्या वाटेला चुकूनही जाऊ नका

कोरोना महामारीत महाराष्ट्राने आणि देशाने अनेक राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू गमावले आहेत. त्याचे कारण काय असे विचारले असता दरेकर सर म्हणाले, आताच्या युवकांत झटपट बॉडीबिल्डर होण्याची घाई असते. त्यामुळे ते चुकून स्टेरॉईड्स, प्रोटीन सप्लिमेंट्स आणि ड्रग्जच्या वाटेला जातात, पण हा प्रकार क्षणभंगुर आनंद देणारा असतो. काही वर्षे तुमचे शरीर या उपायांनी पीळदार दिसते, पण आतून तुमचे शरीर या औषधांनी पोखरले जाते. त्यामुळे चुकूनही प्रोटीन सप्लिमेंट्स, स्टेरॉईड्स आणि ड्रग्ज या झटपट शरीर पीळदार बनवणाऱया उपायांकडे जाऊ नका, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.