कोरोनाचा ‘डेडलॉक! मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांना मोठा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना जागतिक साथीच्या संकटामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद ठेवल्याने त्याचा परिणाम रेल्वेच्या महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांवर होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रखडलेल्या प्रकल्पांवर कोरोनाचा ‘डेडलॉक’ बसणार आहे. तर मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांची (एमयूटीपी) डेडलाईन आणखी किती पुढे ओढली जाईल ते कोणीही सांगू शकणार नाही.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम आधीच ‘तारीख पे तारीख’ या संथगतीने सुरू आहे. त्यात आता कोरोना संकटाचे आयते निमित्त झाले आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू मार्गावर लोकल (ईएमयू सेवा) सुरू झाल्याच्या घटनेला कालच 17 एप्रिल रोजी सात वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या या मार्गावर दोनच ट्रॅक असून साधारण एक तासांच्या अंतराने लोकल चालविण्यात येते. येथे चार ट्रक बांधण्यासाठी एमयुटीपी -3योजनेतून गेली अनेक वर्षे काम सुरू आहे. या रेल्वेमार्गाचे चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी वैतरणा नदी वर दोन मोठे पुल बांधण्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया मार्च महिन्यातच सुरू होणार होती. आणि पावसाळा संपल्यानंतर लगेचच पुल बांधण्याच्या कामाला सुरुवात होणार होती. तिला आता कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर खिळ बसणार आहे.

एमयुटीपी – 2 अंतर्गत सुरु झालेल्या ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम प्रचंड रखडलेले आहे. मुंब्रा येथे खाडी पुलावरुन रेल्वे मार्ग नेण्याचे काम करण्यासाठी आता आणखीनच वेळ लागण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण करण्यात मजूरांची अनुपलब्धता आड आली आहे. रेल्वे कंत्राटी मजूरांमार्फत काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यातच खाडीत काम करणे हेच मोठे आव्हान आहे. भरतीचे वेळापत्रक पाहूनच हे काम होते आहे. साधारण न‌ऊ किलोमीटरचा हा मार्ग बांधून पूर्ण करण्यासाठी तसेच कळवा येथे रुळांच्या ‘कट कनेक्शन’ ची कामे करण्यासाठी 12-12 तासांचे प्रत्येकी 10 ते 12 पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात येणार होते. ते कामही आता पावसाळ्यानंतर करावे लागणार आहे. त्यामुळे या कामांसाठी आता डेडलाईन वाढवावी लागेल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबई वाहतूक प्रकल्पांचा पुरता बोजवारा उडणार आहे.

देशपातळीवरही परिणाम!
रेल्वेच्या देशपातळीवरीलही अनेक मोठ्या प्रकल्पांना कोरोनाचा प्रभाव जाणवणार आहे. शिवाय अनेक प्रकल्प तर आता पैशांअभावी गुंडाळून ठेवले जाण्याची शक्यता दिसत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात आतापर्यंत केवळ 35 टक्के जमिन अधिग्रहण पुर्ण झाले आहे. उर्वरित ७५ टक्के जमिनीचे अधिग्रहण रखडलेले आहे. तर डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉर हा दिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते हावडा या मार्गावर होत आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गावरचे कोंडी दूर होणार आहे. मालगाड्यांच्या ट्रॅफीकमुळे लांबपल्ल्याच्या गाड्या लटकतात. त्यामुळे मालगाडीकरीता कायमस्वरूपी रेल्वे मार्ग ‘डीएफसी’ बांधण्यात येत आहे. या रेल्वेमार्गाचे काम पश्चिम रेल्वेच्या मार्गाच्या शेजारी सुरू आहे. डीएफसीचा पहीला टप्पा लवकरच सुरू होणार होता त्याचेही काम रखडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्राधान्यक्रमच बदलतील
– कोरोनामुळे जगण्याचे सारे प्राधान्यक्रमच बदलतील असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील सहा महिने सगळा पैसा साथ आटोक्यात आणण्यासाठीच खर्च करावा लागेल. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प ज्या लोकांसाठी तयार होत आहेत. त्यांची व्यवहार्यता पुन्हा एकदा तपासून घ्यावी लागेल. लोकच प्रवास करण्यास कितपत पुढे हे आता सांगणे कठीण आहे. कंपन्यांना नोकरकपात करावी लागेल. ऑनलाईन कामे होतील. -विवेक पै – वाहतूक तज्ज्ञ