
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात जनजीवन प्रभावित झालं आहे. या काळात शहरी भागात गर्भनिरोधक साधनांची विक्री वाढली असली तरी ग्रामीण भागात गर्भनिरोधक साधनांची विक्री घटल्याचं वृत्त आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रामीण आणि निमशहरी भागात वाहतुकीचे कमी पर्याय उपलब्ध आहेत. लॉकडाऊनमध्ये वाहतुकीवर संपूर्ण निर्बंध असल्यामुळे आशा वर्कर आणि अन्य कार्यकर्त्या घराघरात जाऊन कुटुंब नियोजनाची सामग्री वाटू शकल्या नाहीत. 31 डिसेंबर ते 31 मार्चच्या तुलनेने एप्रिल ते जून या तीन महिन्यात फक्त 5.85 टक्के गर्भनिरोधक गोळ्या आणि 9.02 टक्के कंडोम वाटण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त रुग्णालयातही याचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही काळात जन्मदर वाढण्याची शक्यता आहे. तसेच अवैध गर्भपात होण्याच्या संख्येत वाढ होण्याचीही शक्यता आहे.
काही वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, या काळात गर्भपाताच्या संख्येत वाढ झाली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान कोरोनाचं संक्रमण झाल्यास तब्बल सात लाख महिलांचा जीव जाऊ शकतो. त्याखेरीज भविष्यात देशभरात गर्भपातांची संख्या लाखोंमध्ये असेल. एकिकडे गर्भपातांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे नसबंदी किंवा अन्य दीर्घ मुदतीच्या किंवा कायमस्वरूपी गर्भनिरोधनाच्या शस्त्रक्रियांच्या संख्येत घट झाली आहे, असं निरीक्षणही तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

























































