कोरोनातील ‘दान यज्ञा’च्या झळा!

539

>> दिवाकर शेजवळ

को रोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठीच्या लॉक डाऊनमधून सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळेही सुटलेली नाहीत. तिथली नेहमीची गर्दी रोखण्यासाठी त्यांना कुलूपबंद करण्यात आले आहे. त्यातून मंदिरांमधील पुजारी आणि तेथील लाखो सेवकांच्या चरितार्थाचा प्रश्न सर्वत्रच उभा राहिला आहे. लॉक डाऊनमुळे मंदिरांतील पुजारी, सेवक, कामगार यांच्यावर देशभरात ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना येण्यास ही मोजकी उदाहरणे पुरेशी ठरावीत.

मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गाच्या कडेलाच कांदिवलीच्या आशा नगर, ठाकूर कॉम्प्लेक्स येथे असलेले प्रसिद्ध ‘साईधाम मंदिर’ही लॉक डाऊनला अपवाद नाही. पण त्याची कथा इतर मंदिरांपेक्षा वेगळी आणि म्हणूनच ती आवर्जून दखल घेण्याजोगी ठरली आहे. गुरुद्वारांची गरीबांसाठी वर्षाचे बाराही महिने तिथे भोजनदानासाठी चालणाऱया ‘लंगर’मुळे ख्याती असते. साईधाम मंदिर हेसुद्धा तिथे गरीबांना रोज दुपारी आणि संध्याकाळी केल्या जाणाऱया भोजनदानासाठी गेली 22 वर्षे प्रसिद्ध आहे. अशी मानवसेवा करणारे मुंबईतील ते एकमेव मंदिर गणले जाते. त्या मंदिराच्या ठिकाणी श्री विष्णुधाम चॅरिटेबल ट्रस्ट, माता महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट आणि साईधाम चॅरिटेबल ट्रस्ट या तीन सेवाभावी संस्था रोज 600 च्यावर गरीबांना भोजनदान करत आल्या आहेत. त्या तिन्ही ट्रस्टचे मुख्य विश्वस्त रमेश जोशी यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हा ‘दान यज्ञ’ अखंडपणे सुरू ठेवलेला आहे. मात्र 25 मार्चला लॉक डाऊन अमलात आल्यानंतर साईधाम मंदिरही इतर प्रार्थना स्थळांप्रमाणे भाविकांना दर्शन-पूजाअर्चासाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे तिथले भोजनदानही पहिल्यांदाच बंद पडून खंडित झाले होते. अखेर भोजनदान पुन्हा सुरू करण्याची विनंती समतानगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांनी साईधामच्या ट्रस्टींना केली. अन् दुसऱयाच दिवशी गरीबांना भोजनदान सुरू झाले.

भोजनदान पुन्हा सुरू होताच भुकेपोटी साईधामकडे येणारे फूटपाथवासीय, लॉक डाऊनमुळे हातचे काम गमावलेले मजूर यांची संख्या पाच हजारावर जाऊन पोहोचली. त्यातच अन्न धान्य, किराणा आणि तत्सम मदतीसाठी गरीब लोक दूर अंतरावरून साईधामकडे येऊ लागले. ते चित्र पाहून मंदिराचे रमेश जोशी यांनी अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ 12 चे पोलीस उप आयुक्त डॉ. बी. एस. स्वामी यांच्याकडे गरजू गरीबांना अन्नधान्य, किराणा वाटप करण्याचाही मनोदय व्यक्त केला. त्यानुसार, साईधाम मंदिराच्या ट्रस्टला जीवनावश्यक वस्तूंची कुठूनही खरेदी करण्याची आणि मालाची वाहतूक करण्याची खास लेखी अनुमती समता नगरचे वरि… पोलीस निरीक्षक रवींद्र पडवळ यांनी 30 मार्चला दिली.

प्रत्येक गरजू कुटुंबाला 15 किलो तांदूळ, 15 किलो पीठ, 4 किलो साखर, 4 किलो गोडेतेल, 4 किलो मीठ, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तू सहा टेम्पोंतून नेऊन वाटप करण्यात आल्या. त्यासाठी साईधाम मंदिराच्या ट्रस्टने तयार केलेली 45 तरुणांची फलटण राब राब राबली. अर्थात या धावपळीत रमेश जोशी हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर, त्यांचे सहकारी भूपेंद्र दुबे यांना बोरिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातच साईधामच्या मदतकार्यात आघाडीवर राहिलेल्या सुमारे 20 स्वयंसेवकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

‘साईधाम’चा पोलिसांनाही आधार
लोकसभा, विधानसभा, महापालिकेची निवडणूक असो की, गणरायाचे वा देवीचे विसर्जन असो, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठीही साईधाम मंदिर नेहमीच आधार बनलेले आहे. बंदोबस्तावरील पोलिसांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था वरि… पोलीस अधिकारी बऱयाचदा या मंदिराच्या व्यवस्थापनावर सोपवत असतात. त्यामुळे त्या मंदिराच्या मुख्य विश्वस्तांना कोरोनाची लागण झाल्याबद्दल पोलिसांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या